अमेरिकेत विवेकानंदानी केलेले योगविवेचन बरेच गाजले.
योगाभ्यासात काही गोष्टी नीट कळाव्या लागतात. त्यातल्या काही नीट वळाव्या
लागतात. काही टाळाव्या लागतात. 'या संदर्भात दोन पारिभाषिक संज्ञांचा वापर
केला जातो. त्यांना अनुक्रमे ''यम'' आणि ''नियम''
अशी नावे आहेत.
'' यम'' म्हणजे संयम. ज्या जगात
आपण राहतो त्याची शुचिता सांभाळली पाहिजे. त्यासाठी काय करावे? भांडण, तंटे,
कलह, यापासून दूर रहावे. स्त्रिया, दलित, पशुपक्षी यांचा छळवाद करू नये. कटु
वचनांचा वापर टाळावा. यालाच ''अहिंसा'' म्हणतात. आत एक व बाहेर एक, सभेत एक व
घरात दुसरे असा दुहेरीपणा स्वभावात नसावा. जे माहीत नाही त्याविषयी बोलू नये.
खरे बोलण्याची संधी टाळू नये. याचेच नाव सत्याचरण. गरजेशिवाय काही गोळा करू
नये. फुकट मिळाले म्हणून काही साठवत राहू नये. अकारण धनसंग्रह, वस्तुसंग्रह
करू नये. हा झाला ''अपरिग्रह!'' जे दुसऱ्याच्या कष्टाचे असते आणि आपले मुळीच
नसते त्यावर हक्क सांगू नये. याला 'अस्तेय' म्हणतात. ''ब्रह्माचर्य'' याचा
अर्थ एवढाच की स्त्री-पुरुषांनी एकमेकाविषयी आदरयुक्त अलिप्तता राखून
आत्मीयतेचे प्रकटीकरण करावे.
आपले नित्यवर्तन कसे असावे आणि कसे
नसावे या विषयीच्या संकेतांची संहिता म्हणजे ''यम-नियम.'
यम नियम हा
झाला पूर्वतयारीचा भाग. पुढे काय?
पुढे प्रत्यक्ष साधना! एका बैठकीवर
विनासायास आणि सहजसुखाने स्थिर होता येणे याला असानासिद्धी म्हणतात.
सिद्धासन, पद्मासन स्वस्तिकासन हे त्याचे दर्शनी रूप असते. अनेक जैन मंदिरात
तीर्थंकाराच्या मूतीर् या स्थितीत आढळतात. व्यवहारात यालाच मांडी घालणे
म्हणतात. आसन सिद्धीने योगारंभ घडतो. एकदा बैठक पक्की झाली म्हणजे पुढे
प्राणायामाचा अभ्यास करावा लागतो. श्वास घेणे व सोडणे या प्रक्रिया संथ व
सुदीर्घपणे घडाव्यात. त्या जमू लागल्या म्हणजे श्वास अल्पकाळ रोखून धरावा. आत
रहाणाऱ्या प्राणवायूचा प्रभाव शरीरातील पेशीवर पडावा. श्वास घेणे, रोखणे व
सोडणे यात एक प्रकारची कालबद्धता असावी.
प्रत्यक्ष प्राणायामाला
सुरुवात करण्यापूवीर् काही दिवस एक सुलभ पूर्वक्रिया सातत्याने काही आठवडे
करावी : श्वास सहजपणाने घेणे व सोडणे असे तिचे स्वरूप आहे. जाणीवपूर्वक श्वास
घेणे व सोडणे एवढेच सुखाने करीत रहावे. नंतर श्वास निरोध न करावयास शिकावे.
स्वामीजींचा 'राजयोग' हा ग्रंथ अभ्यासासाठी आणि प्रत्यक्ष साधनेसाठी
मार्गदर्शक ठरावा. एवढा सुबोध आहे.
अनेक अमेरिकन साधकांना असा अनुभव
आला की प्राणायामामुळे त्यांची त्वचा कांतिमान झाली. डोळे पाणीदार झाले. हाती
घेतलेले काम उत्साहाने घडू लागले. नित्य प्राणायामामुळे कायापालट घडतो याचा
अनुभव परदेशातील अनेक साधकांनी घेतला.
प्राणायामाने आवश्यक ती
नाडीशुद्धी (मज्जाशुद्धी) घडली, म्हणजे धारणा, व ध्यान या मानसिक
प्रक्रियांची अनुभती घेता येते.
'' समाधी'' हे या साधनेचे
'एव्हरेस्ट'!
स्वामीजींनी ते गाठले होते. पण प्रत्येकाने ते उद्दिष्ट
गाठावे असा त्यांचा उपदेश नव्हता. वृत्तीचे समाधान प्राप्त करून घ्यावे.
प्रत्येकाने आत्मशोधाचे, आत्मबोधाचे हे समाधान मिळवावे आणि ज्या
समाजात व जगात आपण रहातो त्याला आपल्या अस्तित्वाने अर्थपूर्णता प्राप्त करून
द्यावी अशी त्यांची अपेक्षा होती.
काही चिकित्सक अभ्यासक योगाच्या
संदर्भात विचारणा करतात : ज्ञानेश्वर आणि विवेकानंद हे योगी होते. त्यांनी जग
लवकर सोडले. त्यांना जगाच्या कल्याणासाठी थांबता आले नसते का?
जगाचे
कल्याण ज्यामुळे घडू शकेल अशा काही तत्त्वांचे आणि वृत्तींचे पसायदान त्यांनी
जगाच्या पदरी टाकले. नंतर ते निवृत्त झाले.
देवाघरची घंटा होते आणि
महापुरुषांच्या कार्यालयाची दारे बंद होतात.
( क्रमश:)
- प्राचार्य शिवाजीराव भोसले