विवेकानंद सतत सभांना सामोरे होत होते. त्याकाळी सभा या
शब्दाला एक प्रकारचे अर्थगांभीर्य होते. आजसुद्धा काही राष्ट्रांत सभा या कमी
वेळा भरतात. सतत सभा, वेळीअवेळी सभा, कारणाशिवाय सभा, प्रचारासाठी सभा असा
सवंगपणा सभा या वर्तन प्रकारात पूवीर् आला नव्हता. काँग्रेस ही एक राष्ट्रीय
सभा होती. सर्वधर्मसभा म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्तित्वात आलेली
विशेषसभा होती.
स्वामी विवेकानंदांच्या व्यक्तिमत्त्वाला, वक्तृत्वाला,
तत्त्वचिंतनाला त्या काळच्या सभांनी एक संदर्भकोंदण पुरविले.
सभेप्रमाणे सहजसंवाद हाही त्यांच्या जीवनात एक महत्त्वाचा भाग होता.
स्वामीजी कधी रानावनात, गुहा-गुंफात, ध्यानधारणा करीत. कधी नुसते गप्प बसत.
कधी कोणा स्नेहांकिताच्या घरात आपला दरबार भरवीत.
बोलणे जर
विचारपूर्वक घडले तर ते अभिव्यक्तीचे आदर्श साधन होऊ शकते. सॉक्रेटीस सतत
बोलत होता. उपनिषदपर्वात गुरू शिष्यांशी बोलत होते. मनुष्य हा एकमेव प्राणी
असा आहे की, तो बोलू शकतो. विचारांना अक्षररूप देऊ शकतो. ज्ञान, विज्ञान,
तत्त्वज्ञान, धर्म हे शब्दभांडार आहे. रामायण, महाभारत, गीता या शब्दांच्या
बँका आहेत. जगाच्या दृष्टीने जे निर्धन होते ते शब्दसधन होते.
स्वामीजींनी आपल्या मर्यादित आयुष्यात मोठ्या उत्कटतेने जगाशी,
जनतेशी संवाद साधला. हा वक्तृत्वस्नेह होता. ज्ञानेश्वर, तुकाराम, व्यास,
वाल्मिकी हे विश्वाचे शब्दस्नेही होते. शब्द-शब्द-विवेकानंदांचे शब्द!
ध्यानिमनी वागवावेत, त्यापायी वेडे व्हावे असे शब्द. 19 नोव्हेंबर 1894 साली
आपल्या भारतीय स्नेहांकिताना लिहिलेल्या पत्रात स्वामीजी म्हणतात :
Push on with the organisation, Nothing else is
necessary but these - love, sincerity and patience. Have fire and spread
all over. work, work. रोमां रोलाँ, टॉलस्टॉय, महात्मा गांधी
हे उगाच का विवेकानंदांपायी वेडे झाले?
स्वामीजी योगाचे वर्ग चालवीत.
युवकांना एकाग्रता म्हणजे काय? त्यामुळे काय घडू शकते? हे समजावून देताना
स्वामीजी म्हणाले :
Take up one idea. Mak
that idea your life - think of it, dream of it, live on that idea let the
brain, muscles, nerves, every part of your body be full of that idea.
आपल्या राजयोगाच्या वर्गात मुला-मुलींना, अभ्यासकांना त्यांनी
काय सांगावे? तुम्ही सहा महिन्यांत योगी व्हाल, पण कधी? कसे? जेव्हा मनाची
एकाग्रता संपादन कराल तेव्हा.
दिवसेंदिवस एकाग्रता दुमिर्ळ होत चालली
आहे. मोबाइल, टी.व्ही.वरचे नानाविध कार्यक्रम, सिनेमा, वृथा गप्पागोष्टी
यांनी हळूहळू जीवनाचा कस, जीवनातील मूळ शक्ती ओसरत जाते, तिला ओहोटी लागते.
स्वामीजी म्हणत युवकांनी व्रतस्थ असावे.
जुन्या पिढीतली काही माणसे
हॉटेलिंग, चौकातल्या गप्पा, टिंगळटवाळी यांचा तिरस्कार करीत. मुलांना त्यांचा
राग येई. आता पुन्हा विचार करण्याची वेळ आली आहे. प्रत्येक महाविद्यालयाच्या
प्रांगणात उमलती मने बहरत असतात. ती दुर्लक्षित असतात. शेवटी ती भरकटत जातात.
इकडच्या गोष्टी, तिकडच्या गोष्टी, गावातले राजकारण, गल्लीतल्या भानगडी,
अपघाताच्या बातम्या... मध्येच माधुरी अथवा आणखी कोणी! हे वाईट किंवा वावगे
असते असे नाही; पण ते चांगले असते असेही नाही. ते दिशाहीन आणि व्यर्थ असते.
व्यक्ती प्रवाहपतित होतात त्या अशा! गतीला दिशा नसली तर ती अधोगती ठरते.
स्वामीजी म्हणत : ''मुक्त व्हा. मुक्त रहा. कोणाचे बंदिवान होऊ नका.
व्यसने तुम्हाला गुलाम करतील. आळस तुम्हाला पराक्रमशून्य करील. तुमचे हे
शत्रू तुमच्यावर टपून आहेत. गुहेतील श्वापदाप्रमाणे. माणसे जीवनसत्वांच्या
गोळ्या घेतात; पण जीवनातील सत्व हरवून बसतात. सत्वशोधक, स्वत्वबोध या
युवकांच्या जीवनातील नियामक शक्ती असल्या पाहिजेत.
योग या
विषयावरच्या एका व्याख्यानात स्वामीजी म्हणाले :
chastity is the cornerstone of morality
. चारित्र्य ही जीवनाची कोनशिला आहे; पण चारित्र्य म्हणजे काय? हा
प्रश्ान् माणसांना कोड्यात टाकतो. मानसशास्त्रज्ञ त्याची मीमांसा करतात
त्याला स्थिरभावनांचा आकृतिबंध म्हणतात. ज्यांना नेमकी दिशा आहे अशा
भावप्रवाहांचा सुरेख संगम म्हणजे चारित्र्य. ध्यास, दिशा, धडपड, तत्त्वज्ञान
ही चारित्र्याची अंगे होत.
मान खाली घालणे, डोळे मिटून घेणे, नुसते
निश्चल राहणे, विशिष्ट रंगाची वस्त्रे धारण करणे म्हणजे चारित्र्यसंपन्न असणे
नव्हे. स्वामीजी स्वत: मुक्त आणि पारदर्शक जीवन जगले. त्यांच्या
व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झालेले अनेक स्त्री-पुरुष त्यांच्याभोवती
भक्तिभावाने उभे राहिले. स्वामीजी हे जनसरोवरातील कमलपत्र ठरले.
'' निरासक्त
जीवननिष्ठा'' हा मनुष्यधर्म झाला पाहिजे. लहानपणी मुलांच्या मनात काही
आकांक्षा रुजवल्या जातात. ''मी डॉक्टर, कलेक्टर, मंत्री होणार'' असे काही
त्यांच्याकडून वदवून, गिरवून घेतात. मुलेही पालकांच्या आकांक्षाचे पाढे गिरवत
स्वत: मिरवत राहतात. या सर्व कवायतीत आत्मनिर्भरता कोठेच नसते.
आत्मसन्मानपूर्वक आचारशुद्ध आणि विचारसमृद्ध जीवन जगावे हा सद्बुद्धीचा कौल
आहे. स्वामीजी म्हणत : जगाचा इतिहास म्हणजे आत्मनिर्भर अशा मोजक्या लोकांची
कहाणीच होय.
(
क्रमश:)
-
प्राचार्य शिवाजीराव भोसले