लोकांना गोंधळात टाकणाऱ्या अद्भूत तरम्यतेवर स्वामीजींनी
कधी भर दिला नाही. पण अनुभवविश्वाचा वेध घेताना काही विलक्षण घटनांचा त्यांनी
उल्लेख केला आहे. आपल्या भारतयात्रेत स्वामीजींचा मुक्काम गाझीपूर या गावी
होता. आपली वाट थोडी वाकडी करून स्वामीजी त्या गावी जाऊन एका स्नेहांकिताकडे
थांबले होते. गाझीपूरच्या सीमेवर एका भूगुंफेत पवन आहारी बाबा नावाचे एक
हठयोगी रहात होते.
ते अन्नभक्षण करीत नसत. वारा हेच त्यांचे अन्न होते.
म्हणून लोक त्यांना पवनआहारी म्हणत. पुढे त्यांना पव्हरी बाबा हे नाव पडले.
हा नामभ्रंश होता. या बाबांनी चारी धामांची यात्रा केली होती. त्यांच्या
साधनेचे महत्वाचे पर्व गाझीपूरच्या त्या गुंफेत घडले. तेथे भूमिगत दशेत
अन्नपाण्याशिवाय सुखाने रहात. लोकांच्या कुतूहलाचा आणि श्रद्धेचा विषय म्हणून
त्यांच्याविषयी अनेक लोकवार्ता निर्माण झाल्या होत्या.
स्वामींजीना
असे वाटत असे की आपले शरीर पोलादासारखे मजबूत व्हावे. तसे ते व्हावे यासाठी
पव्हरी बाबांकडून कांही पाठ घ्यावेत. त्यांचा अनुग्रह संपादन करावा.
सुरूवातीच्या गाठीभेटी झाल्यावर स्वामीजींनी बाबांना साकडे घातले.
आपला मनोदय व्यक्त केला. बाबांनी अनुमती दिली. अपेक्षित अशा योगसंस्कारासाठी
वेळ निश्चित करण्यात आली. रात्रीचा समय, एकान्त आणि एकाग्रता या दृष्टीने
अनुकूल होता.
हा एक वेगळा प्रयोग होता. रामकृष्ण हे स्वामीजींचे गुरू
होते. अशा अवस्थेत आणखी एका गुरूचा अनुग्रह घ्यावयाचा का? स्वामीजींनी आपल्या
मनाच्या समाधानासाठी एक स्पष्टीकरण आपल्याच मनाने तयार केले. स्वत:
रामकृष्णांनी कालीची उपासना करूनही भैरवी योगिनी, जटाधारी, तोतापुरी असे
कांही गुरू केले ना? मग आपण तसा एखादा प्रयोग केला तर रामकृष्ण नाराज होणार
नाहीत. शिवाय रामकृष्ण आज जवळ नाहीत, जगात नाहीत. त्यांच्या अनुमतीची शक्यता
नाही, आवश्यकताही नाही.
अशा मनस्थितीत स्वामीजी आपले निवासस्थान
सोडून अनुग्रहस्थळाच्या दिशेने निघाले. अंधारानी वेढलेल्या अवकाशात त्यांची
पावले वाटेवरून पडू लागली. एवढ्यात त्यांना रामकृष्ण समोर दिसू लागले. ते
स्वामीजींकडे पहात होते. त्यांच्या दृष्टीत कारूण्य होते. या दृश्याने
स्वामीजी संभ्रमात पडले, डळमळले आणि परत फिरले. 'उद्या पाहू' असे म्हणून
त्यांनी आपला मनोदय बदलला दोन दिवसांनी पुन्हा त्यांनी तो विचार केला.
तेव्हां रामकृष्णांचे पुन्हा दर्शन घडले. दोनतीन तास ते रूप दिसे आणि मग
वातावरणात विसजिर्त होत असे.
या घटनेचे स्वामीजींनी कधी स्तोम माजवले
नाही. त्यांच्या जीवनात अनेक अद्भूतरम्य घटना घडल्या त्यांनी या घटनांची नोंद
घेतली पण स्तोम माजवले नाही किंवा भांडवल केले नाही.
ज्यामुळे
विचारांचा भक्कमपणा कमी होईल आणि वृत्तीचा ठिसूळपणा वाढेल अशा गोष्टींना
स्वामीजी गौण लेखत असत. निर्भयता, शक्तिसंपादन, तर्कनिष्ठा याच मूल्यांचा ते
जागर करीत. त्यांच्या जागी अन्य कोणी महाराज असते तर त्यांनी बरीच दलदल
माजवली असती. आगळावेगळा कुंभमेळा भरवला असता जगात कांही घटना अद्भूत आणि रम्य
वाटतात. पण त्यांना निविर्वाद वास्तवाचा दर्जा देण्याच्या मोहात कोणी पडू
नये. त्यांचा अकारण उल्लेख करू नये व मुद्दाम तो टाळू पण नये. त्यांना
इंदधनुष्यातील रंगाचा दर्जा द्यावा. आलेल्या अनुभवांचे स्वागत करावे आणि
अनुभवश्रीमंत व्हावे. मात्र या श्रीमंतीचे भांडवल करू नये.
( क्रमश:)
- प्राचार्य शिवाजीराव भोसले