दिशा दिव्यत्वाची - प्राचार्य शिवाजीराव भोसले


कुत्री आणि मांजरे माणसांच्या संगतीत माणसांसारखी वागू लागतात. ती माणसाळतात. त्याच न्यायाने माणसेसुद्धा कधी देवासारखी वाटतात आणि वागतात. तेव्हा त्यांच्यात देवपण अवतरते. स्वामीजी म्हणत : '' Religion is the idea which is raising the brule unto man and man unto God '' (इंग्लिश खंड 5, पृष्ठ 409) पुढे ते असेही म्हणतात : '' God has become man; man will become God again ' (पृष्ठ 410).

देव माणूसपण धारण करून जगात रमला आहे. माणूस देव होण्याच्या तयारीस लागला आहे. स्वामीजींचा हा आशावाद आणि अभिप्राय गूढरम्य वाटतो.

वटवृक्षाच्या मोहरीएवढ्या बीजात एक समग्र वृक्ष अव्यक्त दशेत नांदत असतो. वृक्षच स्वत: लहानात लहान होतो आणि बीज रूपात लपून राहतो. बीजाला भूमी भेटते, पाणी मिळते, जाग येते आणि वृक्ष होण्याचे स्वप्न पडते. बीज वृक्षरूपात विस्तारते. वृक्षरूप हे बिजाचे आत्मप्रकटीकरण असते.

तसेच माणसात दडलेले देवपण प्रकट होण्यासाठी अधीर असते. भक्ती, ज्ञान, वैराग्य यांमुळे आपल्या ठायी असणारे अव्यक्त आणि अप्रकट देवपण जागे होते आणि नंतर ते बहरते, मोहरते. माणसांचा अभ्यास, व्यवसाय, धडपड ही सगळी आपल्या अंगी असणाऱ्या दिव्यत्वाच्या प्रकटीकरणासाठी घडावी, अशी स्वामीजींची अपेक्षा होती. लहानपणी घरभर कोलाहल माजवून आईला त्रस्त करणाऱ्या मुलांना उद्देशून आई म्हणते: ''अरे, देवासारखे शांत व्हा'' उपनिषदांतील एक महावाक्य असे आहे की, ''अहंम् ब्रह्मा अस्मि.'' ही ब्रह्मारूपात, हे देवपण कलेकलेने विकसित होत जाणे यात जीवनाची सार्थकता आहे.

जर समाजात सतत संघर्षाची वार्ता करणारे आणि डावपेचाचे पवित्रे घेणारे राजकारणी काही क्षण शांत आहे, त्यांनी आत्मपरीक्षण केले तर त्यांच्या वृथा वर्तनाची त्यांना चीड येईल.

एखादा गट किंवा नेतृत्व यांच्या जाळ्यात जे अडकतात, त्यांना आपल्या मूलभूत आणि स्वाभाविक अशा मनुष्यत्वाचे विस्मरण घडते. ते विकृत होतात. जगात वणवे माजतात ते त्यांच्यामुळे.

जगातील सर्व साधुसंतांना स्वामीजींप्रमाणे देवपणाचा वेध लागतो. 'देवजवळी अंतरी' असे जाणवू लागते. ''अहम् ब्रह्मा अस्मि' असा उच्चार एखाद्या आचार्यांच्या मुखातून बाहेर पडतो. त्यांच्याकडे आश्चर्यमुग्ध होऊ पाहणाऱ्या शिष्यास ते सांगतात, ''तत् त्वम असि.'

आज वाढते राजकारण व सत्तास्पर्धा यांमुळे माणसांचे अंगभूत देवपण धोक्यात आले आहे.

माणसांना बहिर्मुख करणारा सुखवाद, शांती आणि समाधान यांपासून त्यांना दूर नेतो आहे.

अशा व्यापक जागतिक संदर्भात एखादा टॉलस्टॉय जगाला पुन्हा आठवण करून देतो : The kingdom of God is within you. .

स्वामीजींचा 'राजयोग' हा ग्रंथ वाचल्यावर या तत्त्ववेत्त्याच्या नजरेत आशेचे किरण चमकत राहिले. बँकेमधली खाती, मजलेदार इमारती, अंगणामधल्या गाड्या, आभाळात भिरभिरणारी विमाने माणसांना स्वत्त्वापासून, आपल्या अंगभूत दिव्यत्त्वापासून दूर दूर नेऊ पहात आहेत.

अशा वेळी 'विवेकाचा जागर' हाच आनंदमार्ग ठरणार आहे. जगभर दिसणारी झगमग आणि झळाळी हा एक भ्रम आहे.

जगाचा वेळीच भ्रमनिरास झाला पाहिजे.

इंग्लंड, अमेरिकेतील युवकांना, युवतींना, प्रौढ स्त्री-पुरुषांना ते सांगत होते : ''जागेवर स्थिर रहा, प्राणायाम करा. ध्यानस्थ व्हावयास शिका.'' त्यांचे योगाचे वर्ग चालत असत. बोलता बोलता स्वामीजी स्वत:च समाधिस्थ होत. मग समोर असणारे गौरकाय स्त्री-पुरुष म्हणत : ॐ शान्ति:

( क्रमश:)

- प्राचार्य शिवाजीराव भोसले