नव्या संस्कृतीची पायाभरणी - प्राचार्य शिवाजीराव भोसले

स्वामीजी सर्वधर्मपरिषदेत आपल्या तेजाने तळपले. या परिषदेत त्यांची 12 भाषणे झाली. स्वामीजींच्या वक्तृत्वाने आणि भाषा प्रभुत्वाने मंत्रमुग्ध झालेल्या अनेक श्ाोत्यांपैकी काहींनी या परिषदेची नोंद आपल्या दैनंदिनीत ठेवली आहे. सौ. ब्लॉजेट यांनी केलेले सारसंकलन असे : ''या परिषदेत स्वामीजींची 12 भाषणे झाली. त्यांचे आरंभीचे व समारोपाचे भाषण फारच सुंदर होते. उरलेली भाषणेही तशीच मनोवेधक होती. परस्थांना आणि दूरस्थांना 'हिंदुधर्म' या विशाल संकल्पनेचे यथार्थ दर्शन घडविणारे भाषण लिखित स्वरूपात अनेकांच्या हाती पडले होते. त्याचे स्वरूप आजकालच्या अभ्यास परिषदांतील शोधनिबंधाप्रमाणे वाटते. हिंदुस्थानातील दार्शनिकांचे सत्ताशास्त्र, मानसशास्त्र आणि अध्यात्मविचार या सर्वांची मनोवेधक रूपरेषा या भाषणात स्वामींनी दिली आहे. जन्माने, धर्माने आणि स्वाध्याय परंपरेने स्वत:ला जे स्वत:ला हिंदू म्हणवून घेतात त्यांनी केवळ हे एकच भाषण वाचले, अभ्यासले आणि आत्मसात केले, तरी त्यांच्या धर्मभावनेला आणि तत्त्वचिंतनशीलतेला उजाळा मिळेल. हे भाषण 19 सप्टेंबर 1893 या दिवशी झाले.

या भाषणात हिंदूंचे अध्यात्मशास्त्र आणि समाजविज्ञान यांचे अक्षरदर्शन घडते. आत्म्याचे अविनाशी स्वरूप, अंतर्यामी असणाऱ्या दिव्यत्वाच्या सूत्रात गोवले जाणारे सर्व जातीधर्माचे लोक; या आंतरिक समानतेमुळे सहज शक्य होणारी सामाजिक एकात्मता आणि सर्वाना समान असणारा आत्मबोध व त्यामुळे प्राप्त होणारे मानसिक समाधान आणि शांती या तत्त्वांचा प्रपंच स्वामींनी सहजतेने केला आहे. स्वामीजींचे या परिषदेतील शेवटचे भाषण 27 सप्टेंबर 1983 या दिवशी झाले.

या भाषणात स्वामीजींनी सर्व कल्याणकारी असा एक उद्बोधक विचार मांडला. ज्याने त्याने आपल्या धर्मात राहून आत्मविकास साधावा. धर्मत्याग आणि धर्मान्तर ही दोन्हीही अनावश्यक आहेत. स्वधर्माभोवती आणखी काही धर्म राहतील. अन्य धर्मातील सत्व आत्मसात करूनही स्वधर्माशी सुसंगत राहता येते. स्वामीजी हा विचार स्पष्ट करताना एक दाखला देतात. एखादे बीज जमिनीत मूळ धरते आणि वाढते. पुढे ते विस्तारते आणि वृक्षरूप धारण करते. त्याला हवा, पाणी, अन्न यांची प्राप्ती घडते, ती मुळाशी असणाऱ्या भूमीतून. पण हे बीज या भिन्न तत्त्वांचा अंगिकार करूनही आपले सत्व आणि स्वत्व सुरक्षित ठेवते. आपल्या अस्मितेनिशी आपले अस्तित्व पूर्णत्वास नेते. याच पद्धतीने ज्याने त्याने आपल्या धर्मात राहून, सर्व धर्मांच्या संगतीत सुखाने आत्मविकास साधावयाचा असतो. सर्वधर्मसहकार हे एक सांस्कृतिक सत्य आहे.

हे धर्मविवेचन सर्वांना आनंददायक आणि आशादायक वाटले. नैराश्य, कलह, संशय ही धर्मजीवनातील विघ्ने दूर करून एक वेगळी विश्वात्मकता निर्माण करण्याचे बळ या भाषणात होते. हे भाषण या धर्मपरिषदेतील पसायदान ठरले. ''विश्व स्वधर्म सूयेर् पाहो'' हा भाव सर्वांच्या मनात निर्माण झाला.

जगात धर्म राहतील. त्यांना अनुयायी भेटतील; पण त्यांच्यात कलह होणार नाहीत. समज आणि सहानुभूती, प्रेम आणि भक्ती, ज्ञान आणि चारित्र्य या गुणांच्या वाती धर्माच्या समईत तेवत राहतील. प्रत्येक धर्माचे निशाण डौलाने फडकत राहील. या धर्मध्वजावर नवे मंत्र तळपत राहतील. जुन्या आग्रहांची जळमटे नष्ट होतील. शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेतील स्वामी विवेकानंदांच्या पहिल्या, मधल्या आणि अखेरच्या सर्व भाषणांनी अवघे वातावरण उजळून निघाले. सर्व धर्माविषयी आदरभावना, स्वधर्माविषयी यथार्थ अभिमान, सनातनी आणि आग्रही पंडित यांनी आपल्या अहंतेने कलंकित केलेल्या परंपरागत विचारांचे खंडन अशा अनेक प्रेरणांनी प्रभावित झालेले स्वामीजींचे तत्त्व प्रतिपादन लोकांच्या मनात घर करू, मूळ धरून राहिले.

परिषद संपली, पण 'विवेकानंद प्रतिमा' लोकमानसात कायमची स्थिरावली. अन्य देशांतील धर्मप्रतिनिधी क्षणभर गतप्रभ झाले. ती माणसे ज्ञानी होती. योग्यतेची होती, तरी ती स्वामीजींएवढी जवळची वाटली नाहीत. याचे कारण काय असावे? हे अकारण प्रेमात पडणे तर नसावे? केवळ लाभावर नजर ठेवणारांचा लोभ संपादन करणे हा एक चमत्कार म्हणावा लागेल. अमेरिका विज्ञानवेडी होती. तत्त्वचिंतनाची तिला गोडी नव्हती. स्वामीजींमुळे लोकांना प्रथम विचारलाभ घडला. मग त्यांना या लाभाचा लोभ सुटला. पण हा लाभ तरी कसला? कोणाच्याही मनात स्वधर्माविषयी रूखरूख राहिली नाही. परधर्माविषयी आकस उरला नाही. चंदकोर पूर्णबिंबाचे स्वप्न पाहत वाढत राहते त्याप्रमाणे जगातील सर्व धर्मांना विश्वधर्माचा वेध लागेल व या 'पूर्णधर्माची' पौणिर्मा सारा मानवलोक उजळून टाकील, असा एक आशावाद सर्वांच्या मनात वाढीस लागला.

जर स्वामीजी या परिषदेस जाऊ शकले नसते किंवा त्यांना परिषदेच्या व्यासपीठापासून दूर रहावे लागले असते, तर जगाचे मोठे नुकसान झाले असते.

भारतात मोठमोठाले आचार्य, ऋषी आणि साधुसंत झाले; पण भारतीय तत्त्वज्ञान जागतिक पातळीवर अवतीर्ण झाले नाही. भारताची ग्रंथभाषा संस्कृत होती. बहुजन हे अभ्यासाचा अधिकार नसणारे अभागी जीव होते. भगवान बुद्ध आणि ज्ञानेश्वर यांनी धर्मविचाराचा ओघ मधले बांध फोडून वहाता ठेवला. या प्रयत्नांना काही मर्यादा पडल्या. इंग्लिश ही जगाची, निदान प्रधान देशांची, ज्ञानभाषा म्हणून मान्यता पावली. सर्व विचारशाखांना आत्मप्रकटीकरणासाठी इंग्लिश भाषा जवळची व सोयीची वाटू लागली. या भाषेतून भारतातील धर्म आणि तत्त्वज्ञान प्रकट होणे गरजेचे होते. काही पाश्चिमात्य तत्त्वज्ञ हे काम त्यांच्या परीने करीत होते. ते मुळात विचारवंत आणि लेखक होते. त्यात कोणी साधक, सिद्ध किंवा प्रेषित नव्हते. विवेकानंदांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि प्रतिपादनाला तुलना नव्हती. साक्षात्कारी पुरुषाचा सहवास, देशभर केलेला प्रवास, संस्कृत ग्रंथांचा अभ्यास, इंग्लिश भाषा, साहित्य आणि तत्त्वज्ञान यांचा आवाका, स्वत: आचरलेली साधना, अखंड ब्रह्माचर्याविषयीचा निर्धार, पुरुषार्थाची ओढ अशा गुणांची सहज स्वाभाविक बेरीज म्हणजे विवेकानंद!

विवेकानंद या युगपुरुषाचे आगळेपण हे की, त्याने जगातील सर्व धमीर्यांना व स्त्री-पुरुषांना विचार आणि साधना यांच्या बळावर हा अधिकार संपादन करता येईल, अशी दिव्यस्फूतीर् निर्माण केली. जगाला प्रकृती होती; पण व्यापक संस्कृती नव्हती. या संस्कृतीची नव्याने पायाभरणी केली ती स्वामीजींनी.

( क्रमश:)

- प्राचार्य शिवाजीराव भोसले