निर्भयतेचा संदेश - प्राचार्य शिवाजीराव भोसले

गेले काही महिने दुष्काळ आणि अतिवृष्टी अशी काही संकटे भारतावर कोसळत आहेत. आज देश स्वतंत्र आहे. सरकार भारतीयांचे आहे. भारत सरकारच्या हाती देशव्यापी सत्ता आहे. सर्व व्यक्ती आणि संस्था संकटनिवारणाच्या कामी संघटित झाल्या आहेत. आपत्ती आणि विपत्ती अशा समयी प्रजेवर छत्र धारण करणारी सत्ता या भारतात नांदते आहे.

स्वामीजी परदेशातून परत आले. त्यांनी रामकृष्ण-संघ स्थापन केला. सेवारत यतींना समाजदर्शन घडवले. ज्ञानसमाधी, गानसमाधी, विचारसमाधी असे शब्द जीवनात रूढ झाले आहेत. स्वामीजी हे एक योगी होते. त्यांनी 'कार्यसमाधी' या नावाचा एक नवीन प्रकार शोधून काढला.

आपल्या गुरूबंधूंना सांगितले : ''रस्तोरस्ती फिरा. घरोघरी जा. लोकांना मदत करा. औषधे, कपडे, अन्न पुरवा.'' ''धनिकांना मागा. गरिबांना द्या.'' रामकृष्णांच्या लेकरांनो, उठा, कामाला लागा! प्रसंगी मोक्षाऐवजी नरकवास पत्करण्याची तयारी ठेवा. देश नावाच्या देवासाठी आणखी काही जन्म घेण्याची तयारी ठेवा. हे भावस्पंदन आणि जीवनआंदोलन केव्हा घडले? परदेशातून परत आल्यावर. 1897 साली. या घटनांवरून एक अटळ निष्कर्ष निघतो तो हा की, विवेकानंदांच्या जीवनाला एक दिशा होती. शिष्यांकडून आणि भक्तांकडून स्वत:ची आरती करून घेणारे ते कोणी महाराज नव्हते.

थोर पुरुषांच्या जीवनाचा विचार करताना सगळाच तपशील नजरेसमोर असला पाहिजे. आपल्या सर्व प्रतिक्रिया परिस्थितीसापेक्ष असतात. या क्रियांचे केंद व्यक्ती हे असते. व्यक्तिजीवनाचे केंद तिचे मन असते. या मनाला चेतना देणारा आत्मा असतो. या आत्म्याला गती देणारा परमात्मा असतो. जीव आणि शिव, शरीर आणि मन, व्यक्ती आणि समाज हे एकाच इंदधनुष्यातील रंग असतात.

हे उमगणे आणि प्रत्यक्ष पावले पडणे यालाच म्हणतात कर्मयोग. कर्माचे आकलन म्हणजे ज्ञानयोग. आकलनशक्ती संस्कारित करणे म्हणजे राजयोग. पडेल ते काम मनापासून करणे, देवाच्या नावाने चांगले काही करणे आणि भलेपण मिळवणे याला म्हणतात 'चांगभले.' भाबडी माणसे म्हणतात : ''देवाच्या नावाने चांगभले.'' भाबड्या लोकांच्या हालचालींमागे देव उभा असतो. पण भाबड्यांची दिशाभूल करणारे संख्येने अधिक असतात. त्यांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य उभे राहते. स्वत:ची स्वखर्चाने आरती करून घेणारे महाराज आणि हा खर्च भक्तांकडून वसूल करून मूळ भांडवलात भर टाकणारे मठाधिपती हे सामाजिक दुदैर्व नव्हे काय?

या दुदैर्वापासून देशबांधवांना मुक्त करू पाहणारे स्वामीजी समजले पाहिजेत.

युवकांना सार्मथ्याचा मंत्र दिला तो स्वामीजींनी.

' भेकडपणापासून मुक्त व्हा' असा निर्भयतेचा संदेश दिला तो विवेकानंदांनी.

एका क्षणी स्वामीजी आत्मलीन दशेत स्वत:शीच सहज गुणगुणले : या देशाला पंधराशे वषेर् पुरेल एवढे काम झाले आहे, केले आहे.

दुसऱ्या एका क्षणी असेच स्वगत व्यक्त झाले : ''भारतात नवे विवेकानंद निर्माण होतील.'' असा हा अजरामर आशावाद ही देशाची आणि जगाची गरज आहे.

विवेकानंद चरित्र हा एक प्रवाह आहे. मागे वळून पाहावे, तर त्याचे उगमस्थान दिसते. पुढे नजर टाकावी, तर त्याचे विस्तारत जाणारे पात्र दिसते. कधी असेही भासते की, रामकृष्ण आणि विवेकानंद ही दोन अनुभव सरोवरे होती. त्यांचे पाणी, त्यामागचे झिरपे यात विभिन्नता होती. पुढे त्यांचे पाणी परस्परात मिसळून एक महासरोवर तयार झाले.

( क्रमश:)

- प्राचार्य शिवाजीराव भोसले