संन्यस्त समाजसुधारक - प्राचार्य शिवाजीराव भोसले

विवेकानंदांचे जीवन हे अनेक अंगांनी संपन्न होते. त्यांनी अखंड विद्याव्यासंग केला. अनेक विचारशाखांचा परामर्श घेतला. त्याचे लिहिणे-बोलणे एखाद्या श्रेष्ठ सारस्वतापेक्षाही आशयसंपन्न होते. त्यांच्या विचार प्रतिपादनातील स्पष्टता एखाद्या दार्शनिकाप्रमाणे होती. त्यांना व्यक्ती, समाज, राष्ट्र आणि जग या विषयी अगत्य होते. ते जन्मभर बोलत राहिले. पण हे बोलणे संयमी आणि विवेकपूर्ण होते. दिशाविहीन आणि वारेमाप वक्तव्य करून फड जिंकण्याची ईर्षा त्यांच्या बोलण्यात कधी आढळली नाही.

काही सारस्वत जीवनशैलीच्या संदर्भात थोड्याफार सवलती घेतात. तणावमुक्त होण्यासाठी त्यांना थोडी शिथिलता किंवा सौम्य व्यसनसुख आवश्यक वाटते. स्वामीजींनी ही टोके टाळली. बंगाली माणसाला आवडणारी हुक्का किंवा गुडगुडी ते अधूनमधून ओढत. त्यांना त्याची चटक नव्हती, पण कधीतरी लहर येत असे. हे सगळे उघड होते. त्यात भासवणे असे काही नव्हते.

त्यांना आयुष्यात जेवणाची वेळ कधी सांभाळता आली. परिव्राजक दशेत अनेक दिवस उपवास घडत. त्यांना त्याचीही खंत नसे. अन्नपाण्याशिवाय जगण्याचा त्यांना सराव होता.

जर त्यांनी आहार, निदा, विश्रांती, प्रवास या संदर्भातील वैद्यकीय संकेत पाळले असते तर त्यांच्या वाट्याला दीर्घ आयुष्य आले असते. पण त्यांना जगण्याची आंधळी ओढ नव्हती. किंवा मृत्यूची भीती नव्हती. जीवन हे अविनाशी आहे. देह नाशवंत आहे. जसे फुलाचे उमलणे आणि कोमेजणे सहज स्वाभाविक मानले जाते, तसे माणसाचे जगात असणे आणि नसणे नैसगिर्क मानावे लागते.

योगातील कांही प्रक्रिया अभ्यासल्या आणि अनुसरल्या तर माणूस काही शतके देह धारण करू शकतो, असे एक मत आहे. यावर स्वामीजी म्हणत : एखादे वडाचे झाड एक हजार वषेर् टिकले तरी त्यामुळे विशेष काय घडणार? शेवटी झाड ते झाडच रहाणार! हे विचारात घेऊन आपण ज्ञानदेव व्हावयाचे की चांगदेव रहावयाचे, याचा विचार ज्याचा त्याने करावा.

आत्म्याला वय नाही. आत्मज्ञानाला अंत नाही. आत्मबोध अविनाशी आहे. तो पारदर्शक असतो. व्यक्तिमत्व हे एक मूल्य आहे. राव आणि रंक, स्त्री आणि पुरुष या सर्वांनाच ते लाभते. ते जन्मप्राप्त असते. त्याचे संवर्धन स्थलकालसापेक्ष असते.

व्यक्तिमत्व हे एक स्वाभाविक परिमाण समजून जगातील सर्व जातीधर्माच्या लोकांचा आदर घडला पाहिजे. व्यक्तिमत्त्व संवर्धनाच्या सर्व पद्धती स्वीकारल्या पाहिजेत. धर्म आणि तत्त्वज्ञान या चिरेबंद गोष्टी नाहीत.

जाती आणि वर्ण या समाजाने तयार केलेल्या तिजोऱ्या आहेत. त्यात असणारे जीवन नावाचे सोने हे रणक्षीय आहे. या तिजोऱ्यांची जडणघडण आणि आकारमान, तसेच त्यांचे रंगरूप गौण आहे. परंपरेच्या पुजाऱ्यांनी ही कपाटे बंद ठेवली. आतला ऐवज ही आपली ठेव मानली. बहुजन समाज उपेक्षित राहिला. तुकारामाप्रमाणे स्वामीजींनी हे भांडार फोडले. दामाजी पंतांप्रमाणे त्याची दारे खुली केली. केशवसुतांच्या शूर शिपायाप्रमाणे आक्रमक धोरण स्वीकारले. हे काम समाजसुधारणेचे आहे. समाजसुधारकांना त्याचे भान उरले नाही तर सन्यस्तांनी समाजसुधारक झाले पाहिजे.

स्वत: स्वामीजी अशा सन्यस्त सुधारकांचे सेनापती झाले.

( क्रमश:)

- प्राचार्य शिवाजीराव भोसले