शिक्षक... एक ज्ञानदेव - प्राचार्य शिवाजीराव भोसले

एकदा एक शिक्षक स्वामीजींना भेटले. त्यांना नमस्कार करून आशीर्वादाच्या अपेक्षेने जवळ बसले. स्वामीजींनी त्यांचे क्षेमकुशल जाणून घेतले. हे गृहस्थ व्यवसायाने शिक्षक आहेत असे कळताच त्यांनी या गुरुजींना निक्षून सांगितले की, हा व्यवसाय सोडून द्या. If one does the work of teaching for a long time he gets blunt in intellect. (Talks p. 174)

या शिक्षकांनी स्वामीजींना विचारले : असे केले तर जगणार कसा? खाणार काय? कमाई संपली तर पुढे काय? एवढा चांगला व्यवसाय असेल का कोठे? स्वामीजी म्हणाले : थोडे जग फिरून पहा. एखादा व्यवसाय सुरू कर. पाच वर्षांत तू स्थिर आणि सुखी होशील. तुझी मिळकत वाढत राहील. त्यासाठी आणि त्यापूवीर् नोकरीचा विचार मनातून काढून टाक.

शिकणाऱ्या माणसाच्या पायात बळ हवे. तो पराधीन होऊन कोणाचा तरी अश्ाति म्हणून जगणारा नसावा. एक तारीख हा त्याच्या जीवनातला पाडवा न ठरावा.

आजकालच्या जीवन पद्धतीत शिक्षणाला प्रयोजन उरले नाही. ज्ञान संपादन, व्यक्तिमत्त्व संवर्धन, सामाजिक अभिसरण या उद्दिष्टांना स्थान नाही. दर्शनी पदव्यांचा प्रपंच थाटणे आणि जन्मभर वरिष्ठांच्या मजीर्चे गणित मांडत राहणे हीच शिक्षितांची जीवनशैली ठरू पहात आहे.

स्वामीजी स्वत: बी.ए.पर्यंत शिकले. त्यापुढे जाण्याची गरज त्यांना वाटली नाही. द्वितीय श्ाेणीचे यश हीच त्यांची लौकिक अर्थाने शैक्षणिक कमाई होती.

त्यांचे स्वयंभूपण, त्यांनी केलेले सार्मथ्यसंपादन, नंतरचा त्यांचा दिग्विजय, या गोष्टी पाठ्य पुस्तकांच्या परिघात मावणाऱ्या नव्हत्या. त्यांचे क्रीडा नैपुण्य, संगीतसाधना, अनेक प्रातिनिधिक ग्रंथ आणि कलाकृती यांची त्यांनी केलेली आलोचना, त्यांनी केलेले देशाटन, कोणत्याही पाशात गुंतून पडावयाचे नाही, हा त्यांचा निश्चय, विरक्त आणि विमुक्त साधकाचे त्यांनी पत्करलेले जीवन अशा अनेक घटकांच्या समन्वयातून त्यांचे जीवनशिल्प साकारले. स्वामीजी एखादी नोकरी पत्करून राहिले असते तर त्यांचे आभाळासारखे जीवन कधीच त्यांना अनुभवता आले नसते.

पदव्यांचे वेड, नोकरीची निवड, ऐषारामाची आवड, जीवन हा एक देखावा समजून त्याकडे पाहण्याची वृत्ती, यातून संपन्न व्यक्तिमत्त्व कसे प्रकट होणार? शिक्षणाच्या नावाखाली पालक, गुरुजन, शेजारीपाजारी, ग्रामस्थ केवळ स्वास्थ्याचा पाढा गिरवून घेतात. पराक्रमाचा पोवाडा कधी मुलांच्या कानी पडू देत नाहीत. धाडस, धडपड, साहस, नवनिमिर्ती, पौरुष, पराक्रम या प्रेरणांची पालवी जीवनवृक्षाला कधीच फुटत नाही.

अशा या ओस जीवनात कसल्या आकांक्षाचे उद्यान फुलणार?

विद्या हे एक व्रत आहे. विद्याथीर् हा एक साधक असतो. गुरुजन हे मार्गदर्शक असतात. त्यांना विद्यार्थ्यांनी, समाजाने किंवा शासनाने मानाने वागवावे.

असे गुरुजन समाजाने शोधून काढावेत. अर्ज मागवून, शिक्षकांना रांगेत उभे करून, अल्पशिक्षितांच्या मजीर्वर आणि सहीवर ज्यांचे भवितव्य अवलंबून असते, असे पराधीन पुरुषोत्तम विद्यार्थ्यांचे जीवन कसे घडविणार?

आजचे वेगवान जीवनमान विचारात घेतले तर गुरुपद, गुरुगृहवास, आचार्यांचा सहवास या कल्पना अव्यवहार्य व हास्यास्पद ठरतील.

निर्वाह आणि नैपुण्य यांच्याशी निगडित असणारे तंत्रज्ञान हे कालसापेक्ष आणि आवश्यक असे एक आन्हिक ठरणार हे उघड आहे. त्या त्या संदर्भात माहिती देणारे मार्गदर्शक हे लागणारच. पण 'गुरू' या संकल्पनेचा निदान एखादा अंश तरी शिकवणाराच्या प्रकृतीत असावा. गुरू हा संस्कारसिद्ध संस्कारदाता असतो. खरा शिक्षक हा मार्गदर्शक तर असतोच; पण तो शिल्पकारही असतो.

या भूमिकेचा जेव्हा अस्त होतो, तेव्हा केवळ नोकरी म्हणून जे करावे लागते किंवा केले जाते त्याला शिक्षण म्हणता येणार नाही. ते करणारा शिक्षक या संज्ञेस पात्र ठरणार नाही.

वाचन, लेखन, चिंतन, विवेचन या महत्त्वपूर्ण प्रक्रिया ज्यात अंतर्भूत नाहीत, अशा उपक्रमाला शिक्षण हे नाव देता येणार नाही. शिक्षक हा जन्मावा लागतो. नंतर तो नेमावा लागतो.

कोणी जन्माचा धंदा म्हणून हे पद स्वीकारू नये. ती भूमिका आहे. तपामुळेच तिला अर्थपूर्णता प्राप्त होते हे जाणून आपली व्यावसायिक उपासना चालू ठेवावी. शिक्षक हा ज्ञानदेव म्हणून शोभावा.

( क्रमश:)

- प्राचार्य शिवाजीराव भोसले