बी. ए. किंवा एम. ए. अशा परीक्षांसाठी विशिष्ट विषयांची
निवड करणे, त्या विषयावरची काही पुस्तके व टिपणे वाचणे आणि उत्तरपत्रिकांचे
सादरीकरण करून पदवी संपादन करणे, हा शैक्षणिक आन्हिकाचा एक भाग झाला आहे.
अन्य परीक्षांचा थाट आणि घाट तसाच राहतो.
अजून विद्यापीठांनी या धोरणात बदल करण्याचे धैर्य दाखवले
नाही. मुक्त विद्यापीठ ही एक भव्य संकल्पना साकारते आहे. ते शुभचिन्ह मानावे
लागेल. त्यापैकी कोणी 'समग्र विवेकानंद' हाच एक विषय ठेवून तो सर्व
पातळ्यांवर अभ्यासला तर काय होईल? विवेकानंदांचे वाचन, प्रवास, योगसाधना,
समाज प्रबोधन, लोकसंग्रह, संस्थात्मक धोरण, स्त्री जीवन विचार, राष्ट्रनिष्ठा
आणि विश्वबंधुत्व या संदर्भातील विवेकानंदांच्या क्रिया-प्रतिक्रिया
अभ्यासकाच्या भूमिकेतून अजमावल्या पाहिजेत.
हल्ली मुले कोठेही उभी
असतात. ती वर्गाबाहेर, चौकात, रस्त्यावर दिसतात. त्यातली फार थोडी
क्रीडांगणावर आढळतात. ग्रंथालयातली पुस्तके जागची हालत नाहीत. परवडणाऱ्या
किमतीत मिळू शकणारी संक्षिप्त टिपणे जवळ ठेवणे, एखाद्या शिकवणी वर्गात जाऊन
बसणे, मार्कांची टक्केवारी सांभाळून पेढे वाटणे हा युवाशक्ती संवर्धनाचा
राजमार्ग ठरू पहात आहे.
तत्त्वाचे आणि धडाडीचे राजकारण हिमतीने केले,
तर त्यात वावगे काही मानता येणार नाही. विवेकानंद हे राजकारणापासून दूर
राहिले. त्यांना मुखवटे आणि हिकमती या गोष्टी मान्य नव्हत्या. त्यांनी
राष्ट्राचा व संस्कृतीचा विचार केला. लोकशक्तीचा आदर केला. श्रमशक्तीचा गौरव
केला. त्यांना फक्त वृथा खटपटी आणि लटपटी आवडल्या नाहीत. ज्याचा उघड जमाखर्च
ठेवला जात नाही, असा गैरमागीर् पैसा त्यांनी निषिद्ध मानला. मनुष्यबळाची
उधळमाधळ त्यांना मान्य नव्हती. कृतार्थ जीवन हा त्यांचा ध्यास होता. अशा
जीवनावर प्रत्येकाचा हक्क आहे. हाच तो जन्मसिद्ध हक्क होय.
एखाद्या
प्रदर्शनात नाना प्रकारच्या वस्तू ठेवल्या जातात. आपल्या निर्माणक्षमतेची ती
रूपे असतात. ही क्षमता एकाच पातळीवर राहाते. प्रदर्शनाला देखाव्याचे रूप
येते. जीवन हे गुणवत्तेचे उद्यान आहे, असे विवेकानंद मानत. विवेकानंदांचे हे
वर्तनसूत्र पाँडेचरी येथे श्री अरविंद आश्रमाने चालविलेल्या शाळेत सांभाळले
जाते. आत्मविकासाची अनेक अंगे असतात. ध्यानधारणा, धावणे-पोहणे व खेळणे, वाचणे
आणि लिहिणे या सर्व उपक्रमांतून सिद्ध होणारे नानाविध आकृतिबंध हे खरे
जीवनदर्शन होय. यालाच
Man-Making Education
असे स्वामीजी म्हणत. अशा शिक्षणामुळे घडते काय?
Character- building हे त्याचे उत्तर आहे.
आजकालचे शिक्षण म्हणजे पैसे मिळवण्याची चलाखी व जीवनाच्या
दर्शनीरूपाचे प्रदर्शन झाले आहे. आपल्या अखिल व्यक्तिमत्त्वाची बांधणी व
उभारणी हे खऱ्या शिक्षणाचे उद्दिष्ट होय.
ज्याने व्यक्ती घडेल,
राष्ट्र वाढेल, जग सुधारेल व सर्वांना आत्मबोध होईल असे शिक्षण कदाचित
रानावनातील पाठशाळात स्वाभाविकतेने देता येईन; पण आता वने आणि उपवने विसरून
जनवनात जीवाचे रान करावे लागेल असे वाटते. शिक्षणाच्या मजलेदार इमारतीत
ज्याचा वास घडावा अशी अपेक्षा आहे, तो विद्याथीर्च उपेक्षित राहातो.
धनवेड्या समाजधुरिणांनी भरविलेली युवकांची यात्रा असे शिक्षण
संस्थांचे दर्शनीरूप आढळत येते. स्वामीजींना अभिप्रेत असणारे जीवन संवर्धक
शिक्षण देऊ शकणाऱ्या समर्थ शिक्षणसंस्था लवकरच जागोजाग उभ्या राहतील अशी आशा
वाटते, हे सत्वर घडावे. बरीच मोडतोड झाल्यानंतरचे ते सावरणे नसावे.
( क्रमश :)
- प्राचार्य
शिवाजीराव भोसले