हल्ली निधर्मी समाज, राष्ट्र अशी एक संज्ञा भारतात रूढ होऊ
पाहात आहे. नित्य व्यवहारात घटना आणि कायदा यांचा अंमल राहील. ज्याचे त्याचे
धर्माचरण घराघरात चालत राहील. धर्म कायद्याच्या वाटेत येणार नाही, अशी
घटनात्मक व्यवस्था झाली आहे.
कायदा आणि धर्म या दोहोंनाही आपआपल्या कक्षेत मनुष्यत्वाचा
आदर करावा लागेल. हे निष्कर्ष आता जीवनात रुळले आहेत.
माणसाची
प्रकृती आणि आरोग्य यांचे स्वरूप विचारात घेणे आणि नवनवीन शोधांनी जीवन
सन्मानित करणे या उपक्रमाला आता मान्यता प्राप्त झाली आहे.
माणसाचे
अंतरंग माणसाला पूवीर्एवढेच प्रिय आहे. अंतरंगाचे आरोग्य ही समस्या
वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यासली जात आहे. जन्म आणि मृत्यू या विषयांचा विचार
मनात येत राहतो. तो येतच राहणार.
ज्ञानाएवढेच ध्यानही महत्त्वाचे
आहे, ही धारणा ज्यांच्याठायी दृढ झाली आहे, असे महात्मे आणि धर्मात्मे आपले
मनोगत सतत व्यक्त करीत असतात.
स्वामी विवेकानंदांची साधना ही 'ईश्वर'
या संकल्पनेपासून सुरू झाली. ईश्वराचा शोध घेण्यासाठी जी वाट पायतळी घालावी
लागते, ती वाट धर्माची असते. अशा वाटा अनेक आणि त्यामुळे धर्मही अनेक, अशी
स्थिती पूवीर् होती. आजही ती आहेच. फक्त मोक्ष, ध्यान आणि उपासना या वर्तन
प्रकारांचे आकर्षण पूवीर्एवढेच राहिले नाही.
विज्ञान हे निरीक्षण आणि
तर्कशुध्द विचार या साधनांचा वापर करते. धर्मात श्रध्दा आणि आप्तवाक्य यांचेच
महत्व अधिक असते. विज्ञान आणि धर्म यातले एक जाईल व दुसरे राहील असे नाही.
दोहोनाही आपआपली भूमिका असेल, मार्ग असेल. एक दुसऱ्याचा पर्याय असू शकत नाही.
एक वगळून केवळ दुसऱ्यावर निर्वाह होऊ शकणार नाही.
विज्ञान हा
भौतिकाचा विचार आहे. धर्म हा अभौतिक अंतरंगाचा विचार आहे.
जीवनात
भावभावना असतात आणि असतील. त्यांचे असे एखादे नियामक तत्व असणारच. हे तत्व
कोणते? स्वामी विवेकानंद हे सर्वधर्म परिषदेसाठी दूरदेशी गेले. तेथे इतर
देशातील अन्यधमीर्य होते. धर्मपरिषद हे न्यायालय नव्हते किंवा निकाली
सामन्यांचे मैदान नव्हते. ते विचारविश्व प्रदर्शन होते. त्याच्याशी समांतर
असे एक भौतिक, यांत्रिक व तांत्रिक प्रदर्शन होतेच. ही दोन्ही प्रदर्शने
जीवनदर्शनेच होती.
या परिषदेत समंजसपणाचे सनईवादन घडू शकले ते
स्वामीजींमुळे. हे श्रेय त्यांना काळाने दिले. या यशात काळाचा वाटा किती?
योगायोगाचा भाग किती?
या जगात जेवढे धर्म होऊन गेले तेवढ्यांची
आचारसंहिता आत्मसात करून ती साधनेच्या अक्षरांनी आत्मसात करणारे रामकृष्ण हे
विवेकानंदांच्या जीवनातील एकमेव तीर्थस्थान होते.
' तीर्थरूप' रामकृष्ण यांचे जीवन
हे एक अनुभवतीर्थ होते. विवेकानंदांनी शिकागोत वाटलेला तीर्थप्रसाद हा
रामकृष्ण धामाची यात्रा पुरी झाल्याचा होता.
रामकृष्ण आणि विवेकानंद
एका भूमीत, एका परिसरात, एकाच कालखंडात अगदी एकमेकांजवळ राहिले. रामकृष्ण
नंतर गेले, विवेकानंदांच्या मुखाने ते बोलत राहिले.
( क्रमश:)
- प्राचार्य शिवाजीराव भोसले