विपर्यस्त धर्मनिष्ठा - प्राचार्य शिवाजीराव भोसले

स्वामीजी एकदा म्हणाले होते की, हिंदू धर्मासारखा उदार धर्म नाही, पण हिंदूंसारखे अनुदार लोक नाहीत. इस्लाम अजून जगभर टिकून आहे. नव्याने इस्लामचा स्वीकार करणाऱ्या निग्रोला त्याची योग्यता पाहून अरबस्थानचा किंवा अन्य मुस्लिम राष्ट्रांचा बादशहा आपली मुलगी देऊन आपला जावई करून घेईल. हिंदूंनी ब्रह्मा सर्वत्र असल्याचा निर्वाळा दिला. प्रत्येक व्यक्ती ही ब्रह्मारूप असल्याची ग्वाही दिली. पण हरिजनांच्या गळ्यात मडके बांधून त्यांना दूर गावाच्या बाहेर हाकून दिले. आपल्या बांधवांना असे निर्दय सीमोल्लंघन घडविणाऱ्यांचा दसरा कोणते सोने पदरी टाकणार?

चर्च किंवा मशीद या धर्मस्थानकात पूवीर् 'व्हीआयपी ट्रीटमेंट' हा प्रकार नव्हता. ईदच्या दिवशी मंत्र्यांचे स्वागत हे स्थित्यन्तर परिस्थितीसूचक आहे. पांडुरंगाची पाद्यपूजा याच वळणावर जाण्याची भीती आहे.

जीवयोनीला खरा धर्म हा पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे आणि मनुष्यत्वाकडून ईश्वरत्वाकडे घेऊन जातो. स्वामीजी म्हणत. ''माणसाचा जन्म एखाद्या धर्मात होत नाही. धर्म माणसाच्या मनात जन्मास येतो!! No man is born to any religion! he has a religion in his own mind. (इंग्लिश खंड 6 पृष्ठ 82) स्वामीजींचा जयजयकार करणारे, त्यांच्या सभांना हजर रहाणारे, रथातून त्यांची मिरवणूक काढणारे, त्यांच्या पायांवर डोके टेकवणारे त्यांच्या विचारांचा अंगिकार करू शकले नाहीत. प्रेषितांची पूजनीयता पाद्यपूजेच्या परगण्यात रहाते. तिला प्रत्यक्ष जीवनाचे वावडे असते.

स्वामीजी पव्हरी बाबांसारख्या संताला शरण जात, पण अहंमन्य मठाधिपतींना महत्त्व देत नसत. ते धर्माची रखवालदारी करणारे हवालदार असतात. माणसाने बुद्धिनिष्ठ असावे, तत्त्वनिष्ठ असावे. अविचाराशी, संप्रदायाशी, आठमुठ्या गुरूशी सख्य करू नये, असे स्वामीजी सांगत.

विवेकानंद हे मनाने मोकळे होते. कोणाच्याही घरी जाणे, रहाणे, जेवणे त्यांना चालत असे. त्यांच्या वृत्तीत उच्चवणीर्यता नव्हती. याच कारणास्तव त्यांना काही मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला. अजूनही भक्ताचे नाव विचारून, आडनाव विचारात घेऊन त्याला मंदिराच्या ओसरीवरून गाभाऱ्यापर्यंत किती पावले पुढे न्यावयाचे, याचे परिपत्रक काढणारे देवस्थानांचे विश्वस्त भेटतात. ते सर्व स्वत:ला हिंदू म्हणवून घेतात. भारत ही धर्मभूमी मानली जाते. पण धर्मविचारातील विसंगती आणि मूढता दूर करून त्याची मूलभूत निर्मलता सांभाळण्याचे अगत्य कोणी दाखवीत नाही. विचारशून्य, गतिशून्य पारंपरिकता आणि अभ्यासकांची आढ्यता तशीच टिकून आहे. ज्यांना लिहिता, बोलता येते ते आपल्याच ऐटीत रहातात. त्यांना व्यक्तिमत्त्व हे मूल्य उमगलेले नसते. त्यांची एकूण ऐट हा एक 'शो' असतो. असे चुकणारे काही सतत भेटत रहाणार. त्यांच्यावरचा राग धर्मावर काढणे उचित ठरणार नाही.

विज्ञानामुळे अॅटमबॉम्ब शक्य झाला. पण बॉम्ब तयार करणे हे विज्ञानाचे कार्य असू शकत नाही. तो विज्ञानविपर्यास आहे.

याच प्रकारे धर्मविपर्यासही घडतो. ज्याचा विपर्यास घडला नाही असा ग्रंथ नाही, धर्म नाही. धर्मविचार विपर्यासविमुक्त झाला पाहिजे असा स्वामींजींचा अट्टहास होता.

( क्रमश :)

- प्राचार्य शिवाजीराव भोसले