विवेकानंदांनी भारत फिरून पाहिला होता. अमेरिका -
युरोपसारखे प्रगत राष्ट्रसमूह पाहिले होते. बंगाली, संस्कृत, हिन्दी, इंग्लिश
या भाषांची त्यांची समज उत्तम होती. व्यासंगातून प्राप्त होणारे प्रभुत्व
त्यांनी संपादन केले होते. जलद गतीने धडे देणाऱ्या शहरी वर्गात थांबून
त्यांनी वक्तृत्वाचे पाठ घेतले नव्हते. केशवचन्द, देवेन्दनाथ, सुरेन्दनाथ,
विजयकृष्ण, प्राचार्य होर्स्ट अशा विद्वान विचारवंतांची भाषणे ऐकली होती.
शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणकालात त्यांच्या रसवंतीचे प्रकटीकरण घडत होते.
मित्रमंडळाच्या बैठकीत पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष अशी खडाजंगी अनुभवली होती.
आपण उत्तर आयुष्यात काय करावयाचे नाही या विषयी ते ठाम होते. लग्न, संसार,
नोकरी करावयाची नाही. पैशाच्या मागे लागावयाचे नाही. ऐहिक स्वास्थ्य, घरदार
या गोष्टींचा ध्यास घ्यावयाचा नाही.
आपले व्यक्तिगत जीवन, विश्वरचना, विधाता ही जीवनपटावरची
कोडी सोडवत रहावयाचे. ही कोडी सोडवणारे कोणी किमयागार असतील तर त्यांच्या
संगतीत रहावयाचे. उगाच कोणाच्याही नादी लागावयाचे नाही. मठामधले अधिपती,
गुंफेमधले स्वामी, मंदिरातील पुजारी, समाजातील विद्वान यांच्या भजनी
लागावयाचे नाही.
प्राप्त झालेला दुर्लभ नरदेह कणखर आणि समर्थ
करावयाचा. गाणारा गळा आनंदाने सांभाळावयाचा. जीवन हे संगीत आहे आणि संगीतात
जीवन आहे. हे जाणून त्याचा रियाझ करावयाचा.
वाचन हा ज्ञानसंपादनाचा
एक मार्ग आहे. उत्तम ग्रंथाची सोबत ही एक शक्ती आहे, हे विसरावयाचे नाही.
शिकागोच्या व्यासपीठावर स्वामीजी तळपले ते आपल्या तपस्येमुळे. आपल्या हिमतीवर
जगणारी माणसे धडका घेत पुढे जातात. धबधबा आणि पराक्रमी व्यक्ती कोणाला वाट
पुसत नाहीत. त्यांच्या पावलामागे मार्ग चालत राहतात.
एखाद्या
लोभापायी तथाकथित श्रेष्ठींच्या दारी घोटाळत राहणाऱ्यांना स्वतंत्र प्रज्ञेचा
बळी द्यावा लागतो हा दारुण अनुभव घेण्याची वेळ त्यांच्या जीवनात आली नाही.
संस्था आणि संघटना यांचे मूल्य ते जाणत होते. पण गट, पक्ष, थवे आणि
मेळावे यांचे त्यांना आकर्षण नव्हते. स्वामी विवेकानंद धर्म, राष्ट्र, समाज,
जग आणि जीवन या विषयांचा गांभीर्याने विचार करीत होते.
त्यांचे एकूण
व्यक्तिमत्त्व संपन्न आणि अद्भुतरम्य होते. वाढीच्या वयात मुलांना विवेकानंद
नावाचे स्वप्न पडावे. त्यांचे चरित्र ही एक स्फूतिर्दायक सत्यकथा आहे.
घरदार, संसार, ऐहिक सरंजाम या गोष्टी चिंतनाचा किंवा ध्यासाचा विषय
होऊ शकत नाहीत. त्या गरजेच्या गोष्टी गरजेप्रमाणे संपादन कराव्यात. पण
अंगावरचे कपडे म्हणजे अंग नव्हे त्याप्रमाणे व्यवसाय म्हणजे जीवन नव्हे हे
कळण्यात खरे स्वारस्य आहे.
जे जीवनाचे अभ्यासक आणि उपासक असतात
त्यांच्यावर जीवनदेवता प्रसन्न होते.
( क्रमश:)
- प्राचार्य शिवाजीराव भोसले